हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर? ४ तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा

विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Updated: Sep 1, 2019, 08:54 PM IST
हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर? ४ तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा title=

इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यातच आता हर्षवर्धन पाटील यांची भर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. ४ तारखेला त्यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात ते पक्षांतराचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये अद्याप संभ्रम असल्यामुळे पाटील नाराज आहेत. पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांनी कार्यकर्ता मेळावा बोलावल्यामुळे त्यांचा याबाबत निर्णय झाल्याचं मानलं जातं आहे.

'सगळ्या कार्यकर्त्यांशी विचार विनियम करण्यासाठी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका जाणून तसंच सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढचा निर्णय घेण्यात येईल', असं सूचक वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. काँग्रेसचे जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार राणा जगजित सिंग पाटील, पिचड पिता-पुत्र, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी भाजपची वाट धरली. तर राष्ट्रवादीच्याच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत आणि उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.