Pooja Khedkar Mother Arrest CCTV Timeline Of Events: रायगडमधील महाडमधून मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना पोलिसांनी अटक केली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई असलेल्या मनोरमा या मागील काही दिवसांपासून फरार होत्या. त्यांना मुळशीमधील एका शेतकऱ्याला थेट पिस्तूल घेऊन धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मनोरमा यांना अटक केली त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. विशेष म्हणजे मनोरमा यांच्या अटकेसंदर्भातील काही धक्कादायक तपशील समोर आला आहे. त्या लॉजमध्ये नाव बदलून राहत असल्याचंही उघड झालं आहे.
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथून अटक केली. शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती रात्री 9.30 वाजता हिरकणी वाडी इथं आल्या होत्या. त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती. तेथील पार्वती हॉटेल इथं बनावट नावाने त्यांनी रुम बूक केली आणि त्या रात्री इथेच राहिल्या. मनोरमा यांनी हॉटेलमध्ये आपलं नावं इंदुताई ढाकणे असं सांगितलं तर त्यांच्यासोबतच्या व्यक्तीने स्वत:चं नाव दादासाहेब ढाकणे असं असल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली. तसे आधारकार्डही या दोघांनी हॉटेल मालकाला दाखवल्याची माहिती समोर येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही, खोली क्रमांक 2 मध्ये हे दोघे रात्रभर राहिले. पोलिसांना मनोरमा या परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस हिरकणी वाडी इथं पोहोचले. त्यांनी इथल्या सर्व लॉजेसची कसून तपासणी केली. अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या तेथे पोलीस पोहोचले. मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता त्यांना ताब्यात घेवून पोलीस पथक पुण्याकडे रवाना झाले. पोलिसांनी मनोरमा यांना मेडिकल चाचणीसाठी नेलं असून आता त्यांची चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल.
आपल्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. लाल दिव्याबरोबरच प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वयीक सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात सापडलं. तसेच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी उद्धट वागणूक दिल्याने त्या सुद्धा चर्चेत आल्या. मनोरमा या चर्चेत आल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला. यामध्ये त्या जमिनीच्या वादावरुन मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसून आलं होतं. याच प्रकरणात शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनोरमा यांचा शोध सुरु केला होता.