Pune Hinjewadi IT Park Latest News: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमधील अनेक कंपन्यांनी इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पुण्यातील वाहतुककोंडीची समस्या दिवसोंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याचा टोला लगावला आहे. ठाकरे गटाने या विषयावरील 'झी 24 तास'ने दिलेल्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत शिंदे सरकारवर टीका केली आहे.
पुण्यातील सर्वात हॅपनिंग परिसर म्हणून मागील काही वर्षांमध्ये हिंजवडी आणि आजूबाजूचा परिसर विकसित झाला आहे. या विकासाबरोबरच हिंजवडी आयटी पार्कमधील वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळेच इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या छोट्या मोठ्या 150 कंपन्यांचे लाखो कर्मचारी अगदी रोजच या वाहतूक कोंडीच्या चक्रव्युहात अडकतात. हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 5 लाखांच्या आसपास आहे. हिंजवडीमध्ये दिवसाला किमान 1 लाख कार्सची ये-जा सुरु असते. प्रत्येक कार रस्त्यात दीड ते दोन तास रखडल्याचं पाहाया मिळतं. त्यामुळेच लाखो रुपयांचं इंधन वाया जातं. या साऱ्या गोंधळामुळे येथील कंपन्यांना तासाला 25 डॉलरचं म्हणजेच 2 हजारांहून अधिक रुपयांचं नुकसान होतं. कंपन्यांच्या याच निर्णयावरुन आता ठाकरे गटाने सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकावर टीका केली आहे.
"घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत," असं म्हणत ठाकरे गटाने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय," असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच, "हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा" असल्याची टीकाही ठाकरे गटाने केली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना ठाकरे गटाने, "महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे," असा टोला लगावला आहे.
घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ… pic.twitter.com/nkSiFXDDce
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 30, 2024
दरम्यान, आता आयटी कंपन्यांच्या स्थलांतरामुळं बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंजवडी ग्रामपंचायतीनं देखील याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत उद्योगमंत्र्यांचं लक्ष 'झी 24 तास'नं वेधलं, तेव्हा माहिती घेतो, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. आता ठाकरे गटाने केलेल्या या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.