Corporate Work Load : अकाऊटिंग फर्ममधल्या मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अर्न्स्ट एंड यंगच्या (Ernst and Young) पुणे युनीटमध्ये (Pune Unit) काम करणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे नोकरीला लागून या तरुणीला केवळ चार महिने झाले होते. कामाच्या अती ताणामुळे या तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. मृत तरुणीचं नाव एना सेबेस्टिअन पेरायील असं होतं. केरळातून तीने चार्टर्ड अकाऊंटंटची परीक्षा पास करुन ईव्हाय कंपनीत नोकरीला लागली होती.
तरुण मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेली आई अनीता ऑगस्टीनने कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात अनीता ऑगस्टीन यांनी कंपनीने कामाचं ओझ टाकल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. एनाने कंपनीत नोकरी सुरु केल्यापासून नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची असं अनीता यांनी म्हटलंय.
कंपनीच्या अपेक्षांचं ओझं
एना पेरायीलने मार्च 2024 मध्ये EY कंपनीत नोकरीला सुरुवात केली. तिची पहिली नोकरी असल्याने कंपनीच्या अपेक्षांवर खरं ठरण्यासाठी तीने दिवस-रात्र कामाला जुंपून घेतलं. मात्र याचा परिणाम तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झाला. एनाच्या आईने केलेल्या दाव्यानुसार नोकरी लागल्यापासून कामाच्या ओझ्याने ती तणावात होती, झोप न येणं, अस्वस्थ वाटणं अशा समस्या तिला सुरु झाल्या होत्या. पण खूप आणि सतत काम करणं हाच यशाचा मार्ग असल्याचं समजून तीने काम सुरु ठेवलं.
एनाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार कामाच्या ताणामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तिचा मॅनेजर अनेक वेळा क्रिकेट सामन्यांमुळे आपल्या मिटिंगच्य वेळा बदलायचा. दिवसाच्या शेवटी तो कर्मचाऱ्यांना काम करायला द्यायचा. त्यामुळे ते काम पूर्ण करण्याचा ताण कर्मचाऱ्यांवर असायचा. एकदा तिच्या मॅनेजरने रात्रीच्यावेळी तिला एक काम सोपवलं. जे सकाळपर्यंत पूर्ण करुन देण्यास सांगण्यात आलं. तीने मॅनेजरला आपली अडचणही सांगितली, पण आम्ही सुद्धा अशीच कामं केली असं उत्तर मॅनेजरकडून तिला देण्यात आलं.
एना गरी आल्यानंतरही रात्री उशीरापर्यंत काम करत असे. ती व्यवस्थित आरामही करत नव्हती. अनेकवेळा कामावरुन आल्यावर कपडे न बदलाताही ती झोपी जात होती. पण या सर्वाचा तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. डेडलाईन पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र एक करत होती, तिची अवस्था पाहून तिला नोकरी सोडण्याचा सल्लाही आम्ही दिला, पण तिला शिकायचं होतं, अनुभव घ्यायचा होता. पण दबाव ती सहन करु शकली नाही, अशी व्यथा एनाच्या आईने आपली पत्रात व्यक्त केली आहे.