पुणे : पुण्यात (Pune) फसवणूकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी चक्क भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यालाच लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मुंबईतल्या (Mumbai) 5 जणांनी या भाजप पदाधिकाऱ्याला अमेरिकेतील क्रिकेट लीगमध्ये (USA Cricket League) टीम विकत घेऊन देतो असं सांगत 1 कोटी रुपयांची मागणी केली. फसवणूक झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आशिष कांटे असं असून याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन आणि विक्रम हुसेन या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
आरोपींची 'ब्रेनस्टॉर्म' (Brainstorm) नावाची कंपनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी आणि आशिष कांटे यांची ओळख झाली, यातून त्यांच्यात अमेरिकेतल्या क्रिकेट लीगबद्दल चर्चा झाली. आशिष कांटे यांना आरोपींनी USA Cricket League 20-20 मध्ये संघ मिळवून देण्याचं आमिश दाखवलं. तसंच लीगमध्ये 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याचं सांगत कांटे यांच्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली. आशिष कांटे त्यांच्या बोलण्यात फसले. यासंबंधी 'ना हरकत प्रमाणपत्र' घेण्यासाठी 55 लाख रुपये आशिष कांटे यांनी आरोपींना दिले. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र आणण्यासाठी कांटे यांनी अमेरिकेची वारीदेखील केली.
हे ही वाचा : निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि....
फसवणूक झाल्याचं आलं लक्षात
पण प्रत्यक्षात आशिष कांटे यांना प्रमाणपत्र मिळालंच नाही. त्यामुळे आशिष कांटे यांनी आरोपींना याबाबत विचारणा केली, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. काही दिवस असेच प्रकार सुरु होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं आशिष कांटे यांच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकरा जानेवारी 2019 पासून सुरु होता. याप्रकरणी आरोपींनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : 'कन्नडिगांच्या राड्यामागे काँग्रेस-जेडीएसचा हात' भाजपाचा गंभीर आरोप
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
आशिष कांटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 34, 406 आणि 420 अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.