मुंबई : भारत.... आपल्या देशाचं वर्णन करत असताना विविधतेत एकता, असं कायमच म्हटलं जातं. इथं देशात राजकीय वातावरणात निर्माण झालेला तणाव पाहता या वातावरणातच 'कुठे एकता आणि कुठे काय', अशीच निराशाजनक भावना आता नागरिकांच्या मनात घर करत आहे.
काही मंडळी मात्र त्यांच्या वर्तणुकीतून ही भावना बळावू न देण्याचं काम नकळतच करत आहेत. सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेत एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार 'जगात भारी' का आहे, याचीही प्रचिती आली.
नेमकं काय झालं ?
हल्लीच पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. कारण इथे एका रिक्षा चालकानं मोठ्या आपुलकीनं, कोणतंही रक्ताचं नातं नसताना एका परदेशी महिलेला आपल्या घरी जेवणासाठी बोलावलं.
आता तुम्ही म्हणाल यात नवल काय, तर जिथं आपलंच पोट हातावर आहे अशा परिस्थितीतही या रिक्षा चालकानं कसलाही विचार न करता आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांना आपुलकीनं घरी बोलवलं.
डिमॅटिक नावाच्या एका कंपनीमध्ये (सोशल मीडियावरील माहितीनुसार) ग्लोबल प्रोजेक्ट इंजीनियरिंग अकॅडमीच्या अध्यक्ष पदावर असणाऱ्या किम रिंकी (Kim Rinke) हिनं हल्लीच पुण्यात भेट दिली. (pune auto rikshaw driver offers american woman a biryani feast )
लिंक्डीन प्रोफाईलवर तिनं हल्लीच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ती एका व्यक्तीशेजारी बसून जेवताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत तिनं लिहिलं, 'या आठवड्यात एंथनी नावाच्या एका रिक्षा चालकाने मला त्याच्या घरी जेवणासाठी बोलावलं. तो मला इथं पुण्यात प्रवासासाठी मदत करतोय. मी त्याच्या घरी गेले, बिर्याणी खाल्ली, गप्पाही मारल्या. माझ्या कुटुंबाच्या तुलनेत तो खरंच गरीब आहे. पण, तो मनानं मात्र फारच श्रीमंत आहे...'.
शेजारीपाजारी इथं अगदी सहजपणे एकमेकांच्या घरी जातात, फ्रिज नसल्यामुळं उरलंसुरलं का असेना जेवण एकमेकांना वाटून खातात. यापूर्वी आपण इतरांच्या जगण्यावर फारसं लक्षच दिलं नव्हतं असं म्हणत किमनं तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
तो अनुभव आणि त्या सर्व व्यक्ती तिच्या मनात कायमचं घर करुन गेल्या. भारतात आलेल्या किमची ही पोस्ट सध्या प्रचंड गाजतेय. प्रवासाच्या निमित्तानं आपल्या देशात येणाऱ्यांना खऱ्या भारताचं दर्शन घडवतेय... कारण किमलाही जाणवतंय.... East or west, India is the Best!