'अजितदादांच्या दारात पोलीस, केव्हाही अटक होऊ शकते?'

ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते.

Updated: Nov 3, 2018, 09:38 PM IST
'अजितदादांच्या दारात पोलीस, केव्हाही अटक होऊ शकते?' title=

पिंपरी-चिंचवड : ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा असा थेट इशारा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथे दिला.

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यांच्या दारात पोलिस उभे आहेत, असे प्रतिपादन  दानवे यांनी  येथे केले. शहर भाजपच्यावतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर आयोजित 'अटल संकल्प महासंमेलनात दानवे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, भाजप शहाराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचे तोंडसुख

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळमध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली म्हणून हे महासंमेलन मावळमध्ये होत आहे. मावळ, शिरुरमधील जनतेचा आशीर्वाद घेऊन २०१९ मध्ये विजय संपादन करणार आहोत. राज्यात सिंचन उपलब्ध करून दिल्यानं शेतीतील उत्पन्नात लक्षणीय वाढ झालीय, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

तुमच्या काळातील सिंचनाच्या वाढीव दराच्या निविदा आम्ही रदद् केल्या. तुम्ही सिंचनाचा पैसा लाटला. सिंचन मात्र झालं नाही, असा टोला राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांनी हाणला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामं न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमित करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

मावळ आणि शिरुरमधून तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोंदींना पाठींबा देतील. ते देणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ते देणार नसतील तर आमचे उमेदवार तयार आहेत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलाय. युती झाल्यास दोन्ही मतदारसंघ सेनेकडे, युती न झाल्यास स्वबळावर निवडून येण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, दानवे आणि फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट बोलायचे टाळले. युतीसाठी आम्ही तयार अन्यथा आम्ही स्वबळावर लढायला तयार अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.