अलिबाग : रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल चक्रीवादळामुळे घरांची छपरे आणि झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. अलिबाग येथे पुनर्वसनाचे काम चालू झाले आहे. दरम्यान, पाऊस आणि वाऱ्याचा धोका अजूनही कायम आहे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे.
अलिबाग येथे पुनर्वसनाचे काम चालू झाले आहे.
Rehabilitation work has begun in Alibag#NisargaUpdates pic.twitter.com/1CxSwI4t90
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागला जोरदार दणका दिला. अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्री वादळ दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास आलिबागजवळ धडकले. मुंबई आणि ठाण्याला वादळाचा तडाखा वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी बसला. मात्र, रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यात वीजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
रायगडमधील मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. घरांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला. पोलादपूर, माणगाव, रोहा, तळा, पेण आणि उरण तालुक्यांतही वादळाचा प्रभाव दिसून आला. रोहा तालुक्यातील सोल्वे कंपनीत भिंत पडल्याची घटना वगळता जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्रात मोठे नुकसान झालेले नाही.