रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता

या चक्रीवादळाच्या तडाख्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले.   

Updated: Jun 4, 2020, 07:24 AM IST
रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेनं आलेल्या आणि अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार, मांडवा या किनाऱ्यांवर धडकलेल्या Cyclone Nisarga निसर्ग चक्रीवादळाचीच दहशत बुधवारी पाहायला मिळाली होती. मंगळवारपासूनच वादळाची चिन्हं पाहायला मिळत होती. ज्यानंतर बुधवारी सकाळपासून रायगड, रत्नागिरी या ठिकाणांवर वादळी वाऱ्यांनी आणखी जोर धरला. 

अखेर दुपारच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकलं आणि स्थानिकांनी कधीही न अनुभवलेल्या दहशतीचा सामना केला. सोसाट्याचा घोंगावणारा वारा, या वाऱ्याला कापत येणारा आवाज, मुसऱधार पाऊस आणि समुद्राला आलेलं उधाण असं एकंदर धडकी भरवणारं चित्र रायगडमधील बहुतांश भागात पाहायला मिळालं. 

रायगडमध्ये तुलनेने जास्त नुकसान करत पुढे सरकलेल्या या वादळाचे परिणाम आणि त्यानंतरची शांतता आता या भगात पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील स्वयंसेवकांच्या मदतीनं उन्मळून पडलेले वृक्ष उचलण्यास सुरुवात झाली आहे. वादळामुळे प्रभावित झालेल्यांनी पुन्हा एकदा घराची वाट धरली आहे. सध्याच्या घडीला वादळ, पाऊ, सोसाट्याचा वारा यांची हजेरी नसली तरीही प्रशासनाकडून मात्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?

 

दरम्यान, 'निसर्ग'च्या केंद्राची व्याप्ती मोठी असणाऱ्या या वादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्यातील बऱ्याच किनारी गावांना बसल्याचं पाहायला मिळालं. विजेच्या खांबांपासून, जुनी- मोडकळीस आलेली घरं, माडाची झाडं, इतर मोठाले वृक्ष या वादळी वाऱ्याच्या माऱ्यात तग धरु शकले नाहीत. वादळी वाऱ्याच्या या माऱ्यामध्ये अर्थाच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये दोघांना आपला .जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे.