सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या (Shrimant Dagdusheth Ganpati Trust) पुढाकाराने श्री गणेश अथर्वशिर्ष (Ganesh Atharvashirsha) यावरील सर्टीफिकेट कोर्स सुरु करण्यात आला आहे. या कोर्सला वयाची मर्यादा नाही, विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक देखील मिळणार आहे. भारतीय संस्कृती जागतीक पातळीवर नेण्याचं काम यातून होत असल्याचा दावा विद्यापीठाने केलाय.
अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला विरोध
पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला विरोध होऊ लागलाय. हा उलट्या पावलांचा प्रवास आहे अशी टीका ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके (Hari Narke) यांनी केलीय. सनातनी स्वप्नांसाठी विद्यापीठं वेठीला धरली जात असल्याचा आरोपही हरी नरके यांनी केला आहे. सनातनी मंडळी पुन्हा एकदा पेशावाईची स्वप्न रंगवत असून त्यासाठी विद्यापीठं वेठिला धरली जात असून हे धोकादायक पाऊल असल्याचं नरके यांनी म्हटलंय.
काय आहे अभ्यासक्रमात
भारत सरकारने नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबलं आहे. या कोर्सच्या माध्यमातून मंत्रांचं महत्व, शारिरीक आणि मानसिक फायदे लोकांपर्यंत पोहचले जाणार असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. शिक्षणाला अध्यात्म तसंच ज्ञान आणि विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणं महत्वाचं असल्याचं विद्यापीठाने सांगितलं आहे. अभ्यासक्रमात एक प्रश्नमालिका देण्यात आली असून त्याची उत्तरं दिल्यानंतर सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.
छगन भुजबळ यांनीही केली टीका
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र शिक्षणाला धर्माच्या राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यवतमाळमध्ये व्यक्त केलं आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठणासाठी महिला गर्दी करतात मात्र बाजूलाच भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेल्या शाळेत माथा टेकवत नाही हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. बहुजनांना धर्माच्या अफूच्या गोळीत गुंगवून ठेवायचे आणि राज्य करायचे असा अजेंडा चालविल्या जात असल्याची टीका देखील भुजबळ यांनी केली.