कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : भारतीय रेल्वेचं लवकरच 'खासगीकरण' होणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारची मक्तेदारी असलेल्या रेल्वेगाड्या यापुढं काही खासगी ऑपरेटर्सना चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. प्रवाशांना अधिक उत्तम सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही मार्गांवरच्या रेल्वेगाड्या चालवण्याची संधी खासगी ऑपरेटर्सना दिली जाणार आहे. भारतीय रेल्वेनं अशी नवी योजना आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेषतः देशातील पर्यटनस्थळांना जोडणारे मार्ग किंवा जिथं प्रवाशांची संख्या कमी आहे, अशा मार्गांवर खासगी ऑपरेटर्सना रेल्वेगाड्या चालवण्यासाठी सुरूवातीला आमंत्रित केलं जाणार आहे. खासगी ऑपरेटर रेल्वे प्रवाशांना अधिक उत्तम आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा देतील, अशी रेल्वे मंत्रालयाला आशा आहे.
भारतीय रेल्वेची दशा सुधारण्यासाठी खासगीकरणाचा हा निर्णय घेण्यात येत असल्याचा रेल्वे खात्यातील अधिकाऱ्यांचा तर्क आहे. त्यानंतर काही प्रीमियम रेल्वेगाड्या आणि मालगाड्या देखील खासगी ऑपरेटर्सकडं सोपवण्यात येणार आहेत.