नाशिक : नाशिकचं मध्यवर्ती कारागृह कायमच कुठल्यानं कुठल्या कारणानं वादात असतं. आता कारगृह प्रशासनाच्या कारभाराचा आणखी एक नमुना समोर आलाय. मध्यवर्ती कारागृहात राहूनच गावगुंड आपल्या टोळ्यांच्या माध्यमातून शहरात गुन्हे घडवीत असल्याने त्यांना इतर कारागृहात हलविण्याची नामुष्की प्रशासनावर आलीय.
कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी कधी मोबाईलच्या माध्यमातून तर कधी भेटीसाठी आलेल्या साथीदारांच्या माध्यमातून शहरात दहशत माजवत आहेत. त्यामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वाढणा-या गुन्हेगारीवर जेव्हा पोलीस अधिका-यांमध्ये खल झाला तेव्हा अधिका-यांच्या संशयाची सुई मध्यवर्ती कारागृहाच्या दिशेने होती.
नाशिक पोलिसांनी यासंदर्भात मध्यवर्ती कारागृहाकडे प्रस्ताव सादर केला असून गुन्हेगारांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने त्यांची रवानगी करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचाराची किड कमी होणार नाही तोपर्यंत गुन्हेगारीवर आळा घालणं कठीण असल्याची चर्चा सामन्यांमध्ये आहे.