पुणे : महाराष्ट्राला नवा 'गोल्ड मॅन' सापडलाय. प्रशांत सपकाळ असं या नव्या गोल्ड मॅनचं नाव आहे. तो पुण्यात राहणारा आहे. अंगावर तब्बल पाच किलोचं सोन्याचे दागिने घेऊन तो वावरताना दिसतो. प्रशांतचा मोबाईल, त्याचं घड्याळ, कडा हे सगळं सोन्याचं आहे. चैनचा विळखाच त्याच्या गळ्याला पडलेला असतो. आता एवढं सोनं घालणार म्हटल्यावर प्रशांतभोवती आठ बाऊन्सर्सचा गराडा असतो.
२७ वर्षीय अवलिया प्रशांत सपकाळ स्वतःला संगीतकार बप्पी लाहिरी यांचा फॅन असल्याचं सांगतो. त्यांच्यामुळेच आपण सोन्याकडे आकर्षित झाल्याचं तो सांगतो. प्रशांत व्यवसायानं बिल्डर आहे. यापूर्वी आमदार रमेश वांजळे ,त्यानंतर दत्ता फुगे असे गोल्ड मॅन महाराष्ट्रानं पाहिले... आता हा गोल्ड मॅनही पुण्याचाच आहे.
प्रशांतचं घड्याळ आणि दागिने सोन्याचे आहेतच शिवाय तो बूटही सोन्याचेच (गोल्ड प्लेटेड) वापरतो. या सोन्याची एकूण किंमत दीड करोड रुपये आहे. प्रशांतकडे सध्या पाच मोठे हार, सोन्याचा कडा, चार अंगठ्या (ज्यात हिऱ्यांचाही समावेश आहे), गोल्ड प्लेटेड वॉच, गोल्ड प्लेटेड मोबाईल आणि गोल्ड प्लेटेड बुटांचा समावेस आहे.
प्रशांतच्या म्हणण्यानुसार, त्यानं मेहनतीच्या कमाईनं हे सोनं खरेदी केलंय. आपल्याकडे प्रत्येक दागिन्याचं बिल उपलब्ध असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. दररोज बाहेर पडताना सोन्यानं मढूनच प्रशांत बाहेर पडतो.
१२ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सोन्याची आवड आजतागायत कायम आहे... आणि त्यासाठी आपण हे दागिने बनवल्याचं त्याचं म्हणणं आहे.