छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा

तर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता.

Updated: Aug 20, 2019, 06:55 PM IST
छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा title=

दीपक भातुसे /चेतन कोळस, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचा एक-एक आमदार पक्ष सोडत असताना आता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ लवकरच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना प्रवेशाबाबत भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या बैठका आणि सभांकडे भुजबळांनी पाठ फिरवली आहे. भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भुजबळ राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे भुजबळांनी पक्ष सोडला तर तो राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.

राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपाची चलती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता येणार नाही असा विश्वास या दोन्ही पक्षातील नेत्यांनाच आहे. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ आणि शरद पवारांचे निकटवर्तीयही राष्ट्रवादी सोडताना दिसत आहेत. भुजबळही तोच विचार करून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील सभेसाठी देखील भुजबळ गैरहजर होते. भुजबळांची प्रकृती ठिक नसल्याने ते निफाडच्या सभेला गैरहजर राहिले असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. मात्र त्याच वेळी भुजबळ आपल्या येवला मतदारसंघात विविध कार्यक्रमात व्यस्त दिसत होते. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीपासून दूर जात असल्याची चर्चा त्यांच्या येवला मतदारसंघात आहे. 

भुजबळांनी शिवसेनेकडे नाशिकमधील येवल्यासह, नांदगाव आणि औरंगाबादची वैजापूरची जागा मागितल्याची चर्चाही मतदारसंघात आहे. मंडल आयोगाला विरोध केला म्हणून भुजबळांनी शिवसेना सोडली, त्यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास आहे.