गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मोदी सरकारने देशात गोहत्या वंश हत्या बंदीचा कायदा लागू केला... मात्र, त्यामुळं हिंगोली पोलिसांना एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.
बैलांची काळजी घेण्याची वेळ सध्या हिंगोली पोलिसांवर आलीय.... त्याचं झालंय असं की बैलांना भोपाळमधून हैदराबादला कत्तलीसाठी जाणारा ४० बैलांचा ट्रक बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली पोलिसांना पकडून दिला. यामध्ये ट्रक चालक एकबालखा गफुरखा आणि केवल मोहन पुरी, ट्रक मालक माजिद खान आणि लियाकत खान या चौघांविरोधात गोहत्या प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झालाय. दोघांना पोलिसांनी अटक केलीय.
उल्लेखनीय म्हणजे, पकडून आणण्यात आलेले हे सगळे बैल पोलीस स्टेशन परिसरात ठेवण्यात आलेत. त्यामुळे बैलांना चारा घालण्याचं, त्यांचं शेण उचलण्याचं कामही पोलिसांवरच आलंय. सात ते आठ पोलीस कर्मचारी या बैलांची निगा राखण्यासाठी तैनात करण्यात आलेत. बैलांच्या चाऱ्याचा आणि औषधोपचाराचा खर्चही पोलिसांनाच करावा लागतोय.
कोंबून जनावरं आणल्याने अनेक बैलांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. ४० पैंकी दोन बैलांचा गुदमरून मृत्यू झालाय. बजरंग दलाला मदतीचं आवाहन केलं तर गोरक्षेचा वारसा घेतलेले हे कार्यकर्ते चक्क पैसे मागतायत.
आता या बैलांची सुटका कशी होणार आणि तोपर्यंत या बैलांचा खर्च पेलण्याचं आणि त्यांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.