लातूर पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर, अल्पवयीन मुलीचा केला गर्भपात

पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता लातूर पोलिसांचा तसाच चेहरा उघड झाला आहे. बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात खुद्द पोलिसानंच केल्याचं लातूरमधल्या घटनेत उघड झालं आहे. 

Updated: Nov 17, 2017, 11:44 PM IST
लातूर पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर, अल्पवयीन मुलीचा केला गर्भपात title=

सांगली : पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता लातूर पोलिसांचा तसाच चेहरा उघड झाला आहे. बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात खुद्द पोलिसानंच केल्याचं लातूरमधल्या घटनेत उघड झालं आहे. 

लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यामधल्या ऊसतोड कामगाराच्या एका १७ वर्षीय मुलीचं एप्रिल महिन्यात अपहरण करुन, जवळपास दीड महिने तिच्यावर ठिकठिकाणी बलात्कार केला गेला. या प्रकरणी ऊसतोड मुकादम अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार यांच्यावर पीडितेनं आरोप केलाय. या प्रकरणी देवणी पोलिसांनी कारवाईसाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. 

आधी पोलिसांनी अपहरण आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र फक्त ट्रकचालक सुरेश पवारलाच अटक केली. तर मुख्य आरोपी अरुण राठोड फरार आहे. गंभीर बाब म्हणजे पीडित मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी, देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक जबाब पीडितेनंच न्यायालयात नोंदवला आहे. त्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थानं उजेडात आलं. 

हे प्रकरण जास्त वाढवू नका अशी धमकीही पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटलांनी दिल्याचा जबाब पीडित कुटुंबीयांनी न्यायालयात केलाय. तर लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना या संपूर्ण घटनेची माहिती देऊनही, त्यांनी या प्रकरणात कसलीच कारवाई केली नसल्याचा आरोप कुटुंबानं केलाय. 

या प्रकरणी उशिरा का होईना लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देवणीचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची बदली लातूर आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, यात काय प्रतिक्रिया द्यायची असं धक्कादायक विधान त्यांनी केलं.

 त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीला न्याय देण्याचं सोडून पोलीस अधीक्षक आरोपी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटीलला पाठीशी घालण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना असा सवाल उपस्थित होत आहे.