लातूर : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचे नाव घेत नाही. निलंगा तालुक्यातल्या केळगावमधले अल्पभूधारक शेतकरी गोविंद बाबुराव गवारे यांनी विष पिऊन आत्महत्या केली.
सततची नापिकी आणि बँकेचं वाढत जाणार कर्ज या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केली. दोन मुलींची लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बँकेचं कर्ज काढलं होतं.
सततच्या नापिकीमुळे ते फेडणं शक्य नसल्यानं कर्ज वाढत गेलं. सरकारच्या कर्जमाफीची कुठलाही फायदा न झाल्यानं अखेर गवारे यांनी आत्महत्येचा पर्याय स्विकारला.
कुटुंबातला कर्ताच नसल्यानं आता संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न गवारे कुटुंबापुढे आहे. गवारे यांच्या आत्महत्येनंतर लातूर जिल्ह्यातल्या शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा ८० वर गेला आहे.