शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

एनएच २११ अर्थात सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद महामार्गाचं तसंच सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून उद्घाटन केलं

शुभांगी पालवे | Updated: Jan 9, 2019, 01:13 PM IST
शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी title=

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी, आपणच भूमीपूजन केलेल्या एनएच २११ अर्थात सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद महामार्गाचं तसंच सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून उद्घाटन केलं. मोदींच्या या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. कम्युनिस्ट आणि विडी कामगार नेते नरसय्या आडाम हेदेखील यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावली. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या ३० हजार असंघटीत कामगारांच्या घरांचा शिलान्यासही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लाभार्थी दोन महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. त्याआधी, सोलापुरातील पार्क मैदानावर भरलेल्या या सभेत पुणेरी पगडी आणि घोंगडी देऊन पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोदींना तलवार आणि भगवदगीता भेट म्हणून देण्यात आली. पंतप्रधानांनी या ठिकाणी केलेल्या भाषणातून त्यांनी लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारसभांना सुरुवात केल्याचं दिसून आलं. मोदींनी आपल्या भाषणात आपल्या कार्यकाळातील विकासकामांवर भाष्य केलंच पण सोबतच काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मंगळवारी लोकसभेत मंजूर झालेल्या सवर्ण आरक्षणाचा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जनतेला संबोधित केलं... 

- 'भारत माता की जय' असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली 

- लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल - रुक्मिणी, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि मंगळवेढ्याचे श्री यांना मी साष्टांग दंडवत घालतो, असं नरेंद्र मोदी यांनी मराठीतून म्हणत उपस्थितांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला.

-  स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिकांचा मराठीतून उल्लेखही यावेळी पंतप्रधानांनी केला

- वीज, रस्ते, पाणी अशा गोष्टींवर सरकारनं विविध कामं केली

- सोलापूर व्हाया तूळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आलीय 

- घरोघरी वीज नेणाऱ्या फडणवीस सरकारचं अभिनंदन 

- काल लोकसभेत सवर्ण आरक्षणाचं ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं... मध्यमवर्गाला न्याय देणारं हे विधेयक आहे. 'सबका साथ सबका विकास' याचं हे विधेयक उदाहरण आहे

- सवर्ण आरक्षणातून गरिबांना विकासाची संधी मिळणार

- जे दलितांना मिळतं, जे आदिवासींना मिळतं, जे ओबीसींना मिळतं ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही... आम्ही अधिकचं १० टक्के सवर्ण आरक्षण देऊ केलंय. त्यावर रात्रीपर्यंत निकोप चर्चा केली.

- खोटं बोलून लोकांना चुकीची दिशा दाखवणाऱ्यांना यातून जोरदार चपराक मिळालीय.

- राज्यसभेतही सवर्ण आरक्षणाला मंजुरी मिळेल अशी आशा आहे.

- लोसभेत अजून एक विधेयक काल पास झालंय. ज्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बांधवांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.

- आसाम आणि उत्तर-पूर्व भागातील बांधवांना विश्वास देतो की, त्यांच्या अधिकारावर आणि संधींवर कोणतीही गदा येणार नाही

- भाजप सरकरच्या साडे चार वर्षात ४० हजार किलोमीटरचे नवीन नॅशनल हायवे तयार झालेत. आणि ५२ हजार किलोमीटरच्या महामार्गांचं काम सुरु झालंय 

- शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो... ३०००० घरांचा आज शिलान्यास झालाय... चावी द्यायलाही आम्हीच येऊ, असा विश्वास देतोय

- मतांच्या राजकारणासाठी विकास खुंटला... कठोर होण्याची वेळ आलीय... आम्ही देखाव्यासाठी कामं करत नाही 

- हवाई चप्पल घालणाऱ्यांसाठी उड्डाण योजना... येत्या काळात सोलापुरातही विमानांचं उड्डाण होताना दिसेल... स्मार्ट सिटी योजनेतही सोलापूरचा समावेश होईल

- दुप्पट वेगानं रेल्वेमार्गांचा विकास होणार

- भविष्यात जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या १० शहरांमधील सर्व शहरे भारतातील असतील, असा एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा अहवाल आहे

- अमृत योजनेंतर्गत ६० हजार कोटींची कामं करून पाण्याच्या समस्या सोडवणार 

- देशात २००४ ते २०१४ या काळात रिमोट कंट्रोल सरकार काम करत होतं

- काँग्रेस १० वर्षांच्या काळात जे करू शकलं नाही ते आम्ही चार वर्षांत करून दाखवलं... 

- काँग्रेसच्या १० वर्षांत १३ लाख घरांचा निर्णय केवळ कागदावरच राहिला. त्यांच्या गतीनं आम्ही कामं केली असतील तर तुमच्या पंतवंडांनाही घरं मिळाली असती की नाही ते सांगता येणार नाही... भाजप सरकारच्या साडे चार वर्षांच्या काळात १४ लाख घरे बनून तयार आहेत.   

- चहाही आता एका रुपयात मिळत नाही, ही गोष्ट एका चहावाल्यालाच माहीत असू शकते

- अटल पेन्शन योजनेचा फायदा आज सव्वा लाख गरिबांना होतोय... कामगार वर्गाच्या हितासाठी ही पेन्शन योजना

- सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार समजणाऱ्या आणि पिढ्यान पिढ्या राज्य करणारे आज कायद्याच्या कचाट्यात सापडलेत  

- बाजारापासून ते संरक्षण करारांपर्यंत दलालांना हटवण्याची मोहीम या चौकीदाराने हाती घेतलीय, असं म्हणत मोदींनी नाव न घेताच गांधी घराण्यावर टीका केली

- मागच्या संरक्षण दलाच्या विमान कराराच्या घोटाळ्या विषयी बोलताना, ख्रिश्चियन मिशेल इतर विमानांसाठीही दलाली करत होता... मिशेल मामाचे कुणाशी नाते, उत्तर द्या... असं म्हणत मोदींनी गांधी घराण्यावर हल्ला केला

- मिशेल मामाशी काँग्रेस नेत्यांचे काय संबंध आहे. याचा खुलासा काँग्रेसला करावा लागणार आहे. मिशेलच्या चौकशीत अनेक बाबी पुढं आल्या आहेत. मिशेल मामाचा सहभाग फक्त हेलिकॉप्ट घोटाळ्यात नाही... तर विमान खरेदी व्यवहारातदेखील सहभाग असल्याचं समोर येतंय, असं म्हणतानाच माध्यमांतील बातम्यांचा हवाला देत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला

- तुमच्या आशीर्वादामुळे चौकीदार लढतोय... तुमचा आशीर्वाद हीच चौकीदाराची ताकद... चौकीदार आता सफाई अभियान थांबवणार नाही 

- मला कल्पना आहे, पुढील आठवड्यात श्री सिद्धेश्वर महाराजांची मोठी यात्रा सोलापुरात भरते... मकरसंक्रांतीच्या आणि सिद्धेश्वर महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाच्या शेवटीही उपस्थितांना मराठीतून शुभेच्छा दिल्या.

- त्यासोबत त्यांनी तेलगू आणि कन्नडमधूनही नागरिकांना शुभेच्छा दिल्यात