अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

'अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत'

Updated: Mar 6, 2022, 01:07 PM IST
अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा title=

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे मेट्रोला (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला. 

पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची ही भूमी आहे, राष्ट्रमाता जिजाऊंची ही भूमी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी भर व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार काय म्हणाले?
पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे.  12 वर्षांपूर्वी मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, पण काही लोकांच्या हट्टामुळे हा प्रकल्प एलिव्हेटेड करावी की अंडर ग्राऊंड यात अनेक वर्षे गेली. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे.

मेट्रोच्या विस्तारित मार्गांच्या कामासाठी केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी करत नागपूर मेट्रो वेगाने पूर्ण झाली. त्याच पद्धतीने पुणे तसंच इतर मेट्रो प्रकल्प पूर्ण व्हावेत. आम्ही त्यात राजकारण आणणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

मुळा मुठा नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण साबरमती रिव्हर फ्रंट च्या धर्तीवर करणयात येणार आहे, पर्यावरण तसेच जीवसृष्टी ला बाधा येऊ न देता हे काम करावे लागणार आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.  अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत,  आपल्याला महामानावांचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यात राजकारण न आणता पुढे जावं लागेल, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. छत्रपतींना स्वराज्य स्थापलं. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कुणाबद्दलही माझ्या मनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूद करतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.