पिंपरीत स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षांनी काढला विरोधकांचा बाप

पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीचा कार्यकाळ आज संपला.

Updated: Feb 28, 2018, 08:58 PM IST
पिंपरीत स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षांनी काढला विरोधकांचा बाप title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीचा कार्यकाळ आज संपला.

मात्र, नेहमीप्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यावेळी झाडल्या गेल्या. मात्र पिंपरी चिंचवडचे राजकीय नेते एवढ्या खालच्या पातळीवर घसरले आहेत की संसदीय भाषेचा त्यांना विसर पडलाय. एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. 

काय बोलल्या सीमा सावळे?

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्ष सीमा सावळे यांची भाषा काय पातळीवर खाली घसरली पाहा... स्थायी समितीचा कार्यकाळ संपल्यावर विरोधकांनी स्थायी समितीवर इतिहासातली सर्वात भ्रष्ट स्थायी अशी टीका केली. त्यावर संतापलेल्या सीमा सावळेंना संसदीय भाषेचा विसर पडला आणि त्यांनी विरोधकांचा थेट बाप काढला... 

प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

सीमा सावळेंच्या स्थायी समितीने गेल्या 10 महिन्यात 3 हजार कोटींची कामं मंजूर केली. एकाच दिवशी समाविष्ट गावांच्या रस्त्यांच्या 425 कोटींच्या कामाला मंजुरी देणे, 210 कोटींच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम, 210 कोटींचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि जवळपास 600 कोटींचे 8 वर्षांसाठी कचरा वाहतूकीचं काम या सर्वांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

बाप काढणं अयोग्य

विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत राहतातच. पण आरोप झाले म्हणून थेट कोणाचा बाप काढणं अजिबातच योग्य नाही. संसदीय लोकशाही पद्धतीत हे शिष्टसंमत नाही याचं भान प्रत्येक नेत्यानं ठेवणं गरजेचं आहे.