पालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!

पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.

Updated: Feb 6, 2019, 05:29 PM IST

पिंपरी-चिंचवड : आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड. या महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला स्वत: बांधलेली रुग्णालये चालवता येत नसल्याने ती खासगी संस्थांकडे चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयानंतर अभूतपूर्व गोंधळ सुरु झाला. या गोंधळातच कोणत्याही चर्चेविना महापालिकेची रुग्णालये खासगी संस्थांना चालवायला द्यायचा निर्णय झाला. हा निर्णय गरिबांची थट्टा करणारा असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

तब्बल ३०० कोटींहून अधिक रुपये खर्चून भोसरी, थेरगाव आणि पिंपरीमध्ये महापालिकेची रुग्णालये उभारण्यात आलेली आहेत. मात्र ती चालवण्यासाठी महापालिकेकडे पैसेच नाहीत. म्हणून ती चक्क खासगी संस्थांना चालवायला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी ही या निर्णयावर टीका केली. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र याचे खापर विरोधकांवर फोडले आहे. शहरातल्या गरिबांवर मोफत उपचार देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. जी रुग्णालये खासगी हातात जाणार आहेत त्यात इमारतीपासून वेगवेगळ्या मशिन्स, खाटा आणि इतर साहित्य महापालिकेचे आहे आणि केवळ महापालिकेला ते चालवता येत नाही, हा युक्तिवादच चुकीचा आहे. यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.