पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.  अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.

कैलास पुरी | Updated: Aug 11, 2023, 06:55 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये एक संतापजनक घटना घडलीय. चाऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने दुचाकी वरून जाणाऱ्या आई आणि तिच्या मुलाला एका मद्यपी वाहनचालकाने धडक दिल्याची घटना घडलीय. या अपघातात आई गंभीर जखमी झालीय तर 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. संतापजनक बाब म्हणजे वाहन चालक एवढा मध्यधुंद अवस्थेत (Drunk Driver) होता की त्याने गाडीला अडकलेल्या त्या चिमुकल्याला 700 ते 800 मीटर अंतर फरफटत नेलं. या अपघातामुळे (Accident) नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. नागरिकांनी चालकाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पार्थ प्रणव भोसले (Parth Bhosle)  हा 7 वर्षांचा मुलगा त्याच्या आई बरोबर गुरुवारी रात्री चाऱ्होली कडून दिघीकडे दुचाकी वरून जात होता. त्याच वेळी मद्यपी कारचालक राहुल तापकीर (Rahul Tapkir) याने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरुन आई खाली पडली. तर पार्थ हा कारच्या खाली अडकला गेला. पण आरोपी राहुल तापकीरला याची कल्पनाच नव्हती. त्याने पार्थला काही मीटर फरफटत नेलं. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पार्थचा मृत्यू झाला. आरोपी राहुल तापकीर याने आणखी काही वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी राहुल तापकिर हा दारु प्यायला होता. त्यामुळे स्कुटीला धडक दिल्याचं त्याला कळलच नाही. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी त्याची कार अडवली. दिघी पोलिसांनी (Dighi Police) तापकीर याला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
दरम्यान, नाशिकच्या द्वारका सर्कल येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला टँकरने जोरदार धडक दिल्याने यात महिलेचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झालाय. सुनंदा राजेंद्र चौरडिया (54) असं मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास चौरडिया दाम्पत्य सिन्नरकडून ठक्कर बस स्टँडकडे जात असताना द्वारका सर्कलवर मोटर सायकलला टँकरने जोरदार धडक दिली. यात सुनंदा यांच्या डोक्याला, छातीला आणि दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलंय.  मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा अधिक तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे..