७९ कोटी रुपयांचं वीज बिल बघून उद्योजकाला '४४० व्होल्टचा झटका'

लॉकडाऊनमुळे उद्योजकांचं कंबरडं मोडलेलं असताना महावितरणही त्यांच्या जीवावर उठली आहे का काय?

Updated: Jun 21, 2020, 11:22 PM IST
७९ कोटी रुपयांचं वीज बिल बघून उद्योजकाला '४४० व्होल्टचा झटका' title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : लॉकडाऊनमुळे उद्योजकांचं कंबरडं मोडलेलं असताना महावितरणही त्यांच्या जीवावर उठली आहे का काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका छोट्या कारखानदाराला २ महिन्यांचं तब्बल ७९ कोटी ९ लाखांचं वीज बिल महावितरणने पाठवलं आहे. 

एवढं मोठं वीज बिल पाहून उद्योजकांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत बाबू चॉन यांचा साई प्रोफाईल नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात लॉकडाऊनदरम्यान जेमतेम काम झालं असेल. महावितरणने मात्र त्यांना ७९ कोटींचं वीज बिल पाठवलं. 

कारखाना विकूनही ते एवढं वीज बिल भरू शकत नव्हते. म्हणून त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर महावितरणने ८४ हजारांचं वीज बिल दिलं आहे. महावितरणचा पारदर्शी कारभार आहे आणि योग्य वीज बिलं दिली जातात, असा दावा केला जातोय. पण हा दावा किती पोकळ आहे, हे या निमित्ताने अधोरेखीत झालं आहे.