नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे. प्रकल्पातील वाढत्या पाणी साठयामुळे धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे थेट या भिंतीतूनच पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रकल्पाच्या भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहत असल्याने शेलुद तसेच परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धरण क्षेत्रात विहिरी, बोरवेल घेण्यात आले. तसेच, विहीर खोदताना झालेल्या स्फोटामुळे भिंतीला तडे गेले. परिणामी धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने त्यातून पाणी बाहेर पडते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.