विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतांना आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. अनेकांना उपचाराअभावी दुर्दैवी जीव गमवावा लागतो आहे. औरंगाबादमध्येही ऑक्सिजन बेडच्या शोधात रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे.
औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे. औरंगाबाद शहरात सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मिळून 902 ऑक्सिजन बेड आहेत, तर 343 आयसीयू बेडस, 187 व्हेंटीलेटर आहेत. मात्र यात जागाच नसल्याने रुग्णांची वणवण सुरु आहे.
प्रशासनाने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि आयसीयू बेड वाढवण्याचे आदेश दिले आहेत, येत्या 8 दिवसांत हे वाढेलही. मात्र वाढणारी रुग्ण संख्या धोकादायक ठरत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
औरंगाबादमधली परिस्थिती गंभीर होत आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय, मात्र नागिरकांना दुर्दैवानं गांभिर्य नाही. मनपानं आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून 17 लाख 49 हजारांचा दंड वसूल केला गेला आहे. यातूनच नागरिकांचीही बेपर्वाई दिसून येत आहे.
औरंगाबादमध्ये आतापर्यंत 28328 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 21063 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत औरंगाबादमध्ये 741 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 200 खाटांच्यावर असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची, माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे, असं बंधनकारक केलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.