परळी : ग्रामपंचायत निवडणुकीत 12 पैकी 10 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने मोठा विजय मिळवला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व सिद्ध झालं. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती, त्यांपैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.
रेवली आणि वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध करण्यात धनंजय मुंडे यांना यश आले होते. परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी आणि हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर येथे 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.
12 ग्रामपंचायत निवडणुकीत 10 ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.