शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार? दोन आमदार प्रतीक्षेत

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता 

Updated: Jul 6, 2022, 09:16 PM IST
शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार? दोन आमदार प्रतीक्षेत title=

गजानन देशमुख, झी मीडिया परभणी : राज्यात सत्तापालट झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सुद्धा पार पडलाय. त्यानंतर त्यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते मंत्रीमंडळ विस्ताराकडे. शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात तरी परभणी जिल्ह्याला लाल दिवा मिळेल का? याकडे परभणीकरांचं लक्ष लागलं आहे. 

परभणी जिल्ह्यातून रासपचे गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे आणि जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्री मिळेल असा विश्वास परभणीकरांना आहे.

16 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्यावर न्यायालयात 11 जुलैला सुनावणी घेतली जाणार आहे, त्यांनतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. आता नव्याने सत्तारूढ झालेल्या शिंदे सरकारमध्ये रासपला स्थान मिळावं यासाठी महादेव जानकर हे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. 

रासपचा राज्यात एकमेव  गंगाखेड विधानसभा मतदार संघात डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या रूपाने आमदार आहे. आमदार गुट्टे रासपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. याशिवाय गंगाखेड मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून इथल्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी रासपकडून सुरू आहे.

गुट्टे यांना मंत्रिपद या कारणाने नाकारलं जाऊ शकतं?
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा पराभव करुन विधानसभेत पोहोचले. विशेष बाब म्हणजे रत्नाकर गुट्टे हे त्यावेळी तुरुंगात होते. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे यावेळी मतदार संघात आठवडाभर तळ ठोकून होते. आमदार गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स लिमिटेड या त्यांच्या साखर कारखान्याने सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाने 365 कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

गुट्टे विरोधात शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्हात त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. सदर प्रकरण उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद मिळणार का याकडेही लक्ष लागलं आहे.

भाजपाच्या मेघना बोर्डीकर साकोरे प्रतीक्षेत
दुसरीकडे मोठा राजकीय वारसा असलेल्या मेघना बोर्डीकर साकोरे या राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना हरवून जिंतूर मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आल्या. उच्च शिक्षित असलेल्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 
महिला आमदार असल्याने त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. शिवसेनेचा बालेकिल्ला हादरवायचा असल्यास परभणीत भाजपला मंत्रिपद देणं भाग पडणार आहे.  मेघना बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत, शिवाय त्या पंकजा मुंडे यांच्या ही निकटवर्तीय मानल्या जातात.

मेघना बोर्डीकरांच्या रूपाने परभणीला मंत्रिपद मिळेल असा विश्वास भाजपला पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटतोय. पण मेघना बोर्डीकर ह्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या असून भाजपकडे मंत्रीपदासाठी अनेक दिग्गज लॉबिंग करीत आहेत. पण परभणी जिल्ह्याला अनेक वर्षांपासून मंत्रिपद मिळालेलं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना सुद्धा शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मंत्रिपद मिळालं नव्हतं.