पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, निवडणूक रंगतदार

पालघर लोकसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्याबरोबर काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने उडी घेतलेय.  

Updated: May 8, 2018, 03:00 PM IST
पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, निवडणूक रंगतदार title=

मुंबई : पालघर लोकसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्याबरोबर काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने उडी घेतलेय. त्यामुळे येथे पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. ही जागा आधी भाजपकडे होती. मात्र, शिवसेनेने येथे आपला उमेदवार उभा केलाय. त्यामुळे भाजपला जोरदार टक्कर मानली जात आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार मैदानात असल्याने भाजपची डोकेदुखी अधिक वाढलेय. तर शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

भाजपमध्ये नाराजी कायम

पालघर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना आयात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दरम्यान, राजेंद्र गावित भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गावित हे आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांचे नाव आघाडीवर असल्याने गावित नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने गावितांची नाराजी लक्षात घेऊन त्यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे पालघर पोटनिवडणुकीत आता श्रीनिवास वानगा यांच्याविरोधात राजेंद्र गावित असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, गावित यांनी युटर्न मारल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. त्यामुळे गावित यांच्याप्रवेशाबाबत अधिकृत माहिती मिळत आहे. गावित यांना भाजपमधून विरोध असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी मोठी शक्तिप्रदर्शनाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप दुर्लक्ष करत असल्याचा वनगा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानंतर वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना शिवसेनेनं भूमिगत केलं होतं. आज श्रीनिवास वनगा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे शिवसेना - भाजप असा सामना रंगणार हे आता स्पष्ट दिसत आहे.