पालघरमध्ये सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात, सत्तेच्या चाव्या कुणाकडे ?

 या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यामध्ये खरी चुरस 

Updated: Jan 7, 2020, 07:55 AM IST
पालघरमध्ये सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात, सत्तेच्या चाव्या कुणाकडे ?  title=

पालघर : राज्यात महाविकास आघाडी असली तरी पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यामध्ये खरी चुरस असून सत्तेच्या चाव्या कुणाकडे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड  यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून 54 जागांसाठी तिरंगी आणि चौरंगी अशी लढाई होणार आहे. 

याचबरोबर ८ तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा पार पडणारेत.57 जागांसाठी 213 उमेदवार रिंगणात आहेत तर 3 बिनविरोध झालेल्या जागा या प्रत्येकी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या खात्यात आल्या आहेत.

भारिप विरुद्ध इतर पक्ष 

जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतही  अकोला जिल्हा परिषदेच्या 53 आणि 7 पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पण इथल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नाहीय. तर भाजप आणि शिवसेना इथे स्वबळावर लढत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. विशेष म्हणजे अनेक बोलणीनंतर सुद्धा जिल्ह्यातिल मूर्तिजापूर विधासभा क्षेत्र वगळता महाविकास आघाडी स्थापन झाली नसून भाजप, शिवसेना आणि भारिप बहुजन महासंघ स्वबळावरही निवडणूक लढत आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.