बारामतीच्या आकाशी पळसमैनांची गर्दी

रोजच्या धावपळीत थोडे सुंदर क्षण जगायचे राहून जातात का? मावळणारा सूर्य आणि त्याला सोबत करणारे पक्षी बऱ्याच दिवसांत कदाचित पाहिलेच नसतील... पण कधीतरी असा सुंदर ठेवा सापडतो.

Updated: Jan 17, 2018, 03:00 PM IST
बारामतीच्या आकाशी पळसमैनांची गर्दी  title=

जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : रोजच्या धावपळीत थोडे सुंदर क्षण जगायचे राहून जातात का? मावळणारा सूर्य आणि त्याला सोबत करणारे पक्षी बऱ्याच दिवसांत कदाचित पाहिलेच नसतील... पण कधीतरी असा सुंदर ठेवा सापडतो.

बारामतीतल्या तांदूळवाडीच्या ओढ्यावरची ही संध्याकाळ... कधी मनमोहक... कधी अवखळ... आरक्त वर्ण लेऊन बसलेल्या आकाशाला सलामी देणारे हजारो पक्षी... नजरेच्या एकाच टप्प्यात... एकाच लयीतले... एकाच सूरातले...

गुलाबी थंडीतली ज्वारी बहरात येऊ लागली की या भोरड्या पक्ष्यांना वेध लागतात... कधी सोनगावच्या रस्त्याला, तर कधी मुढाळ्याच्या बाजूला, कधी सुप्याच्या अभयारण्यात तर कधी तांदूळवाडीच्या सोबतीला हे भोरड्या पक्षी असे घिरट्या घालतात...

गेल्या काही दिवसांपासून तांदूळवाडीच्या पश्चिमेकडच्या ओढ्याजवळ लाखो भोरड्या पक्षी विसावलेत... रोज संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास त्यांचा हा लाईव्ह शो सुरू पाहायला मिळतो. 

पठारी भागात आढळणारी ही पळसमैना.... तिलाच भोरडी किंवा साळभोरडी नावानंही ओळखलं जातं... हा पक्षी थव्यानंच उडतो... त्यांच्या त्या वेगातल्या गिरक्या, ते लयीतलं बागडणं... हे सारं डोळ्यांचं पारणं फेडणारं... या पळसमैनेचा तांदूळवाडीच्या आकाशाशी रोज असा प्रणयसोहळा रंगतो... आणि बारामतीतली संध्याकाळ साजिरी होऊन जाते...