उस्मानाबाद : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ) इथल्या श्री खंडोबाच्या (Naldurg Khandoba Yatra) वार्षिक यात्रा महोत्सवास 5 जानेवारी ( गुरुवारी ) रोजी सुरुवात होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं (Naldurg Khandoba Festival) आयोजन करण्यात आलं असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान 7 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले तसंच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपूराहून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केलं अशी आख्यायिका आहे.
श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्गमध्ये दोन वेगवेगळी मंदिरं असून मूर्ती मात्र एकच आहे. अणदूरमध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात देवाचा करार केला जातो,. देवाचा करार करण्याची प्रथा महाराष्ट्रात फक्त याठिकाणी चालते, हे विशेष.
मूर्ती अणदूर इथून नळदुर्गला आणल्यानंतर यात्रोत्सव सुरू असतो. दर रविवारी भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यास खेटे असं संबोधलं जातं. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीला मूर्ती अणदूरला नेण्यात येते.
6 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस
नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. महायात्रा 5 जानेवारी रोजी सुरु होणार असून, 6 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. शुक्रवारी ( दि. 6 ) पहाटे 4 वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करुन अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे. त्यांनतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे.
दिवसभर भंडारा आणि खोबरे उधळणे , विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक ,लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री 12 वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्याचे आणि अणदूरहुन आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी रंगीबेरंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे.
मध्यरात्री 2 वाजता मंदिरात अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पहाटे 3 वाजता श्री ची छबिना मिरवणूक निघणार आहे. शनिवारी ( दि. 7 ) दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेची जय्यत तयारी सुरू
यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,स्नान करण्याठी कॅनालला पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.