इस्त्रायली पाईपलाईनमध्ये अस्सल भारतीय घोटाळा, 'झी २४ तास' इव्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश

योजनेतला घोटाळा आणि शासकीय स्तरावरील अनास्था शेतक-यांना कशी जाचक ठरते हे बघायचं असेल तर उस्मानाबादला जावं लागेल. तब्बल 15 वर्ष आणि तिप्पट खर्च करूनही पाईपलाईन प्रकल्प रखडल्यानं हिरव्या बागा कोरडवाहू झाल्यात.

Updated: Jan 25, 2022, 09:31 PM IST
इस्त्रायली पाईपलाईनमध्ये अस्सल भारतीय घोटाळा, 'झी २४ तास' इव्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश  title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, उस्मानाबाद : योजनेतला घोटाळा आणि शासकीय स्तरावरील अनास्था शेतक-यांना कशी जाचक ठरते हे बघायचं असेल तर उस्मानाबादला जावं लागेल. तब्बल 15 वर्ष आणि तिप्पट खर्च करूनही पाईपलाईन प्रकल्प रखडल्यानं हिरव्या बागा कोरडवाहू झाल्यात.

जगभरात यशस्वी ठरलेल्या इस्त्रायली पद्धतीची बंद पाईपलाईन योजना उस्मानाबाद जिल्ह्यातही राबवण्यात आली होती. तेरणा धरणाचं पाणी या पाईपलाईनमधून शिवारात पोहोचवण्यात येणार होतं. मात्र गेल्या 15 वर्षांमध्ये तब्बल 39 कोटी 45 लाख रुपये खर्च करूनही योजना अद्यापही अपूर्णच आहे. 

योजनेवर अवलंबून असलेल्या 14 गावांचा दुष्काळ कायम आहे. निकृष्ट दर्जाचं काम करून ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये लाटल्यानं योजनेचा बोजवारा उडाल्याचा आरोप होत आहे. या योजनेची मूळ किंमत 19 कोटी रूपये होती. मात्र योजना लांबवत नेल्यानं हा खर्च 39 कोटींवर गेला. केवळ मुरूम आणि खडीसाठी 5 कोटी रुपये वापरले गेलेत. कोट्यवधी रुपयांचे पाईप टाकले गेले आहेत. पाईपखाली काँक्रिट बेडवर कोट्यवधी खर्च करूनही त्याचं काम निकृष्ट झालंय. तर टेस्टिंगच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा झाला. 

पूर्वी तेरणा धरणातलं पाणी कालव्यातून 15 गावांपर्यंत पोहोचवलं जात होतं. त्यावर अनेक शेतक-यांनी चांगल्या बागा फुलवल्या. मात्र पाण्याची नासाडी टाळण्यासाठी 2007 साली इस्त्रायली पद्धतीच्या पाईपलाईनची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आणि कालवे बंद करण्यात आले. हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावल्यामुळे एकेकाळचा बागायतदार शेतकरी आता देशोधडीला लागल्याचं झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झालं.

शिवसेनेचे स्थानिक आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अधिवेशनात यावर प्रश्न विचारला होता. त्याचाही उपयोग झालेला नाही. चौकशी सुरू असल्याचं ठोकळेबाज उत्तर अधिकारी देत आहेत. 

दुष्काळवाडा ही या भागाची ओळख पुसण्यासाठी योजना आणली खरी. पण राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याला जबाबदार असलेले ठेकेदार आणि अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.