स्टेशनवर संत्री विकणाऱ्याकडून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन दान, सरकारने देऊ केलेले पैसेही नाकारले

सध्या भारतात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पहिल्या लाटे पेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरणारी आहे.

Updated: Apr 26, 2021, 02:49 PM IST
स्टेशनवर संत्री विकणाऱ्याकडून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन दान, सरकारने देऊ केलेले पैसेही नाकारले title=

नागपूर : सध्या भारतात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पहिल्या लाटे पेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरणारी आहे. त्याच बरोबर ती जास्त भयानक देखील आहे. अशात सरकारी रुग्णालये, डॅाक्टरांवर आणि इतर गरजेच्या वस्तूंवर ताण पडत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, इंजेक्शन सारख्या महत्वाच्या गोष्टींचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यांने अनेक रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे. परंतु असे काही लोक आहेत जे आपल्या देशाप्रति आपले कर्तव्य विसरत नाहीत आणि आपल्या परिने ते मदत करत असतात.

नागपुरातील एक उद्येजक आता लोकांना मदत करायला पुढे सरसावले आहे. त्यांचे नाव आहे प्यारे खान. प्यारे खानने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सरकारी रुग्णालयांना आता पर्यंत सुमारे 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

यासाठी त्याला तब्बल 85 लाख रुपये खर्च आला आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना मोबदला देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, परंतु हे पैसे न स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी असे सांगितले की, "ही मानवतेची सेवा आहे आणि ते माझं कर्तव्यच आहे.

ऑक्सिजन दान करून समाजाची सेवा करण्याचा लाभ मला मिळाला त्यातच मी समाधानी आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी संकटाच्या काळात मदत करायला हवी. गरज भासल्यास ब्रुसेल्स येथून काही टँकर एअरलिफ्ट करुन आणण्याची देखील आमची तयारी आहे."

प्यारे खान हे नागपुरातील सध्याचे मोठे उद्योजक आहेत. नव्वदच्या दशकात नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर ते संत्री विकायचे. पोटापाण्यासाठी त्यांनी रिक्षाही चालवली आहे. खान हे सध्या आश्मी रोड करिअर्स प्राइव्हेट लिमिटेड ही कंपनीकडं चालवतात. त्यांच्याकडे 300 ट्रकचा ताफा आहे आणि सध्या त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य 400 कोटी इतके आहे.

गरिबीतून आलेल्या प्यारे खान यांना या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे. म्हणूनच ते त्यांच्या परिने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी करोना रुग्णांच्या मदतीसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. नागपूर जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीनं सध्या ते स्वत: ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था पाहत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या 360 सिलिंडर आणि प्यारे खानकडे असलेले सिलिंडर असे एकूण 760 सिलिंडर त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांना पुरवले आहे. रायपूर, रुरकेला आणि भिलई येथे ते आपले टँकर पाठवून, तिथून ऑक्सिजन भरून आणतात आणि मग ते नागपूर आणि आसपासच्या परिसरात पुरवतात.