पुणे : Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाट माथ्यावर आजही मुसळधार पावसाची शक्यता असून रायगड, पालघरमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात आज सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली वगळता सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता आहे. राज्यातील मान्सूनचा जोर 16 तारखेपासून काहीसा ओसरेल, असा पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
अजून दोन दिवसांनी मान्सून राज्यात उसंत देणार आहे. असे असले तरी कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, मुंबईत सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.