मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, सर्व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेनेच कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. यामध्ये आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना वगळण्यात आलं आहे.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच उत्पादन क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत राज्य शासनाचे आदेश.#MissionBeginAgainhttps://t.co/IuUZFA1l38
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 19, 2021
याशिवाय सरकारी कार्यालयांचा विचार केला तर, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती कशी आहे, हे पाहावं आणि त्यानुसार कार्यालयात किती कर्मचारी बोलवावे, याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. फेब्रुवारीपर्यंत 2 हजारावर असलेली नव्या रुग्णांची संख्या आता 25 हजारावर पोहोचलेली आहे. 18 मार्चला आतापर्यंतची महाराष्ट्रीतल सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. काल राज्यात 25 हजार 833 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
राज्यात आतापर्यंत 21,75,565 जण कोरोना बाधित झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.79 टक्के इतकं आहे. राज्यात सध्या 8,13,211 जण होम क्वारंटाईन असून 7,079 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.