मयुर निकम, झी 24 तास, बुलढाणा : ऑनलाइन गेमचा नाद खूप वाईट आणि जीवावर बेतू शकतो याची कल्पनाही पालक आणि मुलांना नसेल. महाराष्ट्राला हादरवून आणि पोलिसांना चक्रावून टाकणारी एक घटना समोर आली आहे.
आठवीमध्ये शिकणारी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 27 नोव्हेंबरला तिच्या वडिलांनी दिली होती. या मुलीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि त्यांना धक्कादायक माहिती समोर आली.
गायब झालेल्या मुलीचा शोध अखेर लागला. मोबाइलवर "फ्री फायर' गेम खेळता खेळता ती झारखंडमध्ये पोहचलेली अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. या 8 मधील मुलीला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन होतं. ऑनलाइन गेम खेळता खेळता तिची ओळख झारखंडमधील उदनापूरच्या २० वर्षीय तरुणाशी झाली.
तो आणि त्याचा मित्र तिला घ्यायला मलकापुरात आलेले. त्यांच्यासोबत ती झारखंडला गेली. १ डिसेंबरला मलकापूर पोलिसांनी मुलीला झारखंडमधून ताब्यात घेतलं. आता महाराष्ट्र पोलिसांनी मुलीला कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं आहे.
आता मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन कोणत्या थराला जाऊ शकतं हे यावरून लक्षात येईल. त्यामुळे आपली मुलं काय करतात याकडे पालकांनीही लक्ष देणं तेवढंच गरजेच आहे. या प्रकरणी मित्राला ताब्यात घेतलं आहे. तर मुलीला झारखंडवरून महाराष्ट्रात आणलं असून पालकांकडे सोपवण्यात आलं आहे.