असा धोका ! ऑनलाईन कार, डिजिटल कॅमेरे भाड्याने घेऊन परस्पर विक्री

एका भामट्याने ऑनलाईन संकेतस्थळावरून भाड्याने कार आणि डिजिटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक.

Updated: Dec 29, 2018, 05:03 PM IST
असा धोका ! ऑनलाईन कार, डिजिटल कॅमेरे भाड्याने घेऊन परस्पर विक्री title=

ठाणे : फसवणुकीचे बरेच प्रकार सुरु असतात आणि ते करणारे भामटे नवनवीन क्लुप्त्या शोधूत असतात, अशाच फसवणुकीच्या नवीन प्रकाराने लोकांना फसवणाऱ्या एका भामट्यास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने ऑनलाईन संकेतस्थळावरून भाड्याने कार आणि डिजिटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री केली. त्यांनी करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. भामटा मौजमज्या करण्यासाठी असे  फसवणुकीचे प्रकार करत होता. पोलिसांनी या भामट्याकडून ३ कारसह ११ डिजिटल कॅमेरे जप्त केलेत. जवळपास १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय.

किसननगर येथील विशाल सानप याने ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. महेश भोगले नावाच्या व्यक्तीने फेसबूकवरून ओळख करून नंतर गोड्गोड बोलून त्यांच्याकडील डीएसएलआर कॅमेरा भाड्याने घेतला आणि तो पळून गेला. त्याचा काही थांगपत्ता नाही. ठाणेनगर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला. त्यावेळी पोलिसांना समजले महेश भोगले याने अशाच प्रकारे बऱ्याच जणांची फसवणूक केली आहे आणि तो पळून गेला आहे. या आरोपीच्या तपासाकरिता एक पथक स्थापना करण्यात आले आहे.

या पथकाने सर्व तांत्रिक माहिती काढून महेश साबाजी भोगले याला महाबळेश्वर येथून अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने मौज मज्जा करण्यासाठी हा फसवणुकीचा धंदा सुरु केला. तो कॉम्पुटरमध्ये एक्सपर्ट आहे. बोलण्यात पटाईत असल्यामुळे त्याच्यावर लोकांचा पटकन विश्वास बसत असे. त्याने बऱ्याच जणांकडून डिजिटल कँमेरा ओएलएक्स साईटवर सर्च करून त्यांच्याशी संपर्क साधून नंतर ते भाड्याने घ्यायचा. घेतलेले कॅमेरे तो परत न करता परस्पर विकून टाकायचा, असे व्यवहार करताना तो सावध असायचा. 

स्वतः तो भाड्याने राहायचा. कार, कॅमेरे विकल्यानंतर भाड्याचे घर सोडून द्यायचा. तसेच मोबाईल नंबरही बदलायचा. त्यामुळे तो सापडत नव्हता. हे तो सातत्याने करत होता.  आतापर्यंत ११ डिजिटल कँमेरे आणि तीन कार यात टाटा टिएगो, शेवरोलेट, टाटा टेम्पो या गाड्यांचा समावेश आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 12 लाख 65 हजार 299 रुपयाचा माल जप्त केलाय.