मुंबई / औरंगाबाद : MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. 250 पैकी केवळ 105 आगार सुरू झालेत. इतर कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. मेस्मा लावला तरी चालेल मात्र आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये गंगापूर बस डेपोच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. बसच्या काचा फुटल्या आहेत. बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे या बसच्या मागच्या काचा फुटल्या आहेत. नेवासा फाट्यावर या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. काल संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली.
तर दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होत आहे. (Maharashtra Government cabinet meeting) या बैठकीत एसटी संपाबाबत चर्चा होण्याची शक्यता असून यातून कसा मार्ग काढायचा याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे. राज्य सरकारने सांगितले आहे की इतर मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, विलिनीकरण हे एका दिवसात होणार नाही. याचा सारासार विचार करावा लागेल. जी समिती नेमण्यात आल्या आहे, तिचा जो निर्णय येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मात्र, संप अद्याप सुरुच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. त्याबद्दल बोलताना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना चिथवण्याला बळी पडू नका, हा प्रश्न चर्चैतून सुटला पाहिजे. आधी कामावर या, कारवाई करणार नाही हा दिलेला शब्द मी पाळला. पण न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला तर कदाचित न्यायालय कारवाई करू शकते, असंही परब यांनी स्पष्ट केले.