मुंबई : नववर्षाची सुरूवात कोरेगाव भीमा दंगल आणि त्याच्या पडसादांनी झाली. दरम्यान या कारणावरून 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
महाराष्ट्र बंद असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी 'महाराष्ट्र बंद'मुळे झालेले नुकसान, वित्तहानी तुम्ही पाहिली असेल,पण या काळात नागपुरात मेश्राम कुटुंबीयांना माणुसकीचं दर्शन झालं.
पांजरा परिसरात राहणार्या कांचन मेश्राम यांना 3 जानेवारीच्या मध्यरात्री प्रसुतीकळा सुरू झाल्या. एकीकडे कांचन यांचा त्रास वाढत होता. तर दुसरीकडे रूग्णालयापर्यंत जाण्यासाठी वाहन शोधण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू होती.
महाराष्ट्र बंद आणि परिसरात तणावाचं वातावरण असताना रिक्षा किंवा दुसरे एखादे वाहन मिळणंदेखील शक्य नव्हतं. अशामध्ये सुमारे 10 किमी लांब ओला कॅब उपलब्ध असल्याची माहिती मेश्राम कुटुंबीयांना लागली.
ओला कॅबचा चालक शहजाद खान सुरूवातीला घाबरला होता. मात्र समोरची परिस्थिती गंभीर असल्याचं समजल्यानंतर त्यानेही हे आव्हान स्विकारलं. घरापासून10 किलोमीटर लांब असलेल्या डागा रुग्णालयकडे कॅब सुरक्षितपणे शहजादने चालवली.
दरम्यान रुग्णालयात पोहचण्याआधीच कांचन मेश्राम यांनी कॅबमध्ये एका चिमुकल्याला जन्म दिला होता. शहजादने बाळ आणि बाळंतिणीला रुग्णालयात सुखरूप पोहचवले.
ओला कॅबने शहजादच्या कामगिरीची दखल घेतली. शहजादची निवड ड्रायवर ऑफ द मंथ म्हणून केली. शहजादप्रमाणे ओलाने बाळ आणि बाळंतिणीलाही पुढील 5 वर्षांसाठी मोफत राईडची सोय दिली आहे.