आता काश्मीरचं केशर महाबळेश्वरमध्ये पिकणार

मिनी काश्मीरात केशरची शेती

Updated: Feb 9, 2021, 08:08 PM IST
आता काश्मीरचं केशर महाबळेश्वरमध्ये पिकणार  title=

महाबळेश्वर : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर.. म्हणजे महाबळेश्वर.. गुलाबी थंडी... हिरवीगार वनराई.. आणि स्ट्रॉबेरीची आंबड-गोड चव चाखण्यासाठी देशभरातील पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन म्हणजे महाबळेश्वर.. मात्र आता याच महाबळेश्वराला आणखी एक नवी ओळख मिळाली आहे. महाबळेश्वरमध्ये आता काश्मीरचं केशर पिकणार आहे. म्हणून महाबळेश्वरला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. कांद्यासारखे दिसणारे हे कंद आहेत केशराचे.. काश्मीरात पिकणारं  केशर आता महाबळेश्वरमध्येही पिकू लागलं आहे. 

कृषी विभागातर्फे महाबळेश्वर मध्ये केशर लागवडीचा पहिला प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. मेटगुताड आणि क्षेत्र महाबळेश्वर या भागात केशरच्या कंदाची लागवड करण्यात आली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेला पाऊस याचा थोडा फटका केशरला बसला. मात्र हंगाम निघून गेल्यावरही यातील काही कंदांना फुलं आली. आणि महाबळेश्वरच्या मातीत केशर पिकू लागलं.

आता केशराच्या पुढच्या पिकासाठी थोडं थांबावं लागणार आहे. सध्या केशराच्या एका कंदापासून आणखी कंद बनवण्यावर भर दिला जातोय. केशर पिकासाठी पोषक वातावरण, तापमान, समुद्र सपाटी पासूनची उंची या सगळ्या गोष्टी महाबळेश्वर मध्ये जुळून येत आहेत त्यामुळे आता लवकरच बाजारात काश्मीरी केशरसोबत महाबळेश्वरी केशर येईल यात शंकाच नाही.