कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय. 

Updated: Sep 8, 2020, 01:21 PM IST
कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर title=

नागपूर :  नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय. काही महिन्यांपूर्वी आंबेकर राहत होता. तो बंगला नेस्तनाबूत करत भुईसपाट केला होता. याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या अडीच हजार वर्गफूट क्षेत्रावरील चार मजली इमारतीचे अतिक्रमण तोडण्यास मनपाने सुरुवात केली आहे. पुढील चार ते पाच दिवस ही कारवाई चालणार आहे.

 गुंड संतोष आंबेकरनं अनेक लोकांकडून मालमत्ता हडपल्यात. त्याच्या जुन्या बंगल्याशेजारीच त्याचे पुन्हा  एक अनधिकृत चार मजली बांधकाम आहे. पत्नीच्या अर्थात नेहा आंबेकरच्या नावावर आहे. 

या घराचा क्रमांक 484  असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टीअंतर्गत येत असल्याने मनपाने 11 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र स्लम ॲक्टच्या कलम 3 झेड-1 अंतर्गत नेहा संतोष आंबेकरला नोटीस बजावली होती. 

सदर नोटिशीला नेहा आंबेकरनं मनपाच्या  कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली होती. मालमत्तेसंदर्भात कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने सदर अपील फेटाळण्यात आली. त्यानंतर नेहा आंबेकरनं अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली. 

मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकरचं अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज केले. यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घरात ठेवले होते. घराला सील करण्यात आले होते.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतफेर अपील फेटाळले जाताच गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण  सामान काढण्याबाबत मनपाने सूचित केले. 

गुन्हे शाखेने तात्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी  केली. तळमजला जवळपास 2311.7 वर्ग मीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेले चार मजली घर असून त्यावर मनपाचा हातोडा चालविण्यात आला. 

दाटीवाटीच्या क्षेत्रात हे घर असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी  लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.महत्वाचं म्हणजे सैय्यद साहिल या कुख्यात गुंडाचा बंगलासुद्धा काही दिवसांपूर्वीच मनपाने  जमीनदोस्त केला होता, हे विशेष.