साखरवाडीची 'कडू' कहाणी... गावात अजूनही रस्ताच नाही

साता-याच्या कराड तालुक्यातील  साखरवाडी गाव.. डोंगरात वसलेल्या साखरवाडीची लोकसंख्या जवळपास ५००... मात्र गावात अजून दळणवळणासाठी रस्त्याची सोयच नाहीये. 

Updated: Aug 27, 2017, 07:40 PM IST
साखरवाडीची 'कडू' कहाणी... गावात अजूनही रस्ताच नाही  title=

विकास भोसले, झी मीडिया, सातारा : साता-याच्या कराड तालुक्यातील  साखरवाडी गाव.. डोंगरात वसलेल्या साखरवाडीची लोकसंख्या जवळपास ५००... मात्र गावात अजून दळणवळणासाठी रस्त्याची सोयच नाहीये.

शाळेतील विद्यार्थ्यांना ६ किलोमीटरची पायपीट करून शाळेत जावं लागतंय.  तेही जंगलातल्या रस्त्यानं ज्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याची भीती असते. तरीही साखरवाडीतील विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उतीर्ण होतात. याच गुणवंताचा झी २४ तासनं गौरवही केला आहे.

साखरवाडी गावचा डोंगरी गावामध्ये समावेश करण्यासाठी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. जिल्हाधिका-यांपासून ते मुख्यमंत्र्यांपासून निवेदनंही दिली मात्र कोणताही दखल शासनानं घेतली नाही.

वनविभागानंही डांबरीकरणाला विरोध केला असून या रस्त्याला निधीही मंजूर झाला होता. मात्र कंत्राटदारानं निकृष्ठ काम केल्यानं रस्ता वाहून गेला..यावर शासनानं त्वरीत निर्णय न घेतल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष लोटली. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज सारख्या घोषणा वारंवार दिल्या जातात मात्र साखरवाडीसारख्या गावाच्या वाटेला अजूनही रस्ता दिसत नाही हीच खरी शोकांतिका आहे.