पुणे : नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. नाराजीच्या चर्चेवर अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. तसेच काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षांतर्गत बदलाचा अधिकार काँग्रेसचा (Congress) आहे, असे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध उपक्रमांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी अजित पवार यांना माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांची आठवण आली. निमित्त होते आर आर पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांच्या सत्काराचे. राजाराम पाटील यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून करवीरला बदली झाली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
यावेळी अजित पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय होतील. आमच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता, मात्र त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे. पटोले यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही.
पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही, गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती. आणखी एक उपमुख्यमंत्री पद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितलं, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी नीलेश राणे यांना फटकारे. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, असे म्हणत नीलेश राणेंवर निशाणा साधला. मी नीलेश राणे यांना मोठं का करू, असे ते म्हणाले.
तसेच उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाे भाषण थांबवायला हवं होते, असे सांगत अजित पवार यांनी बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत. आता तिथं कोण येणार? काय बोलणार? याची आम्हाला माहिती असते का, असे ते म्हणाले.