नाशिक : ऐन दिवाळीमध्ये बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला आहे. नाशिककरांना तर त्याचा चांगलाच फटका बसला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातून एक जोडपे पैसे काढण्यासाठी नाशिक शहरात आले होते. त्यांना भाऊबीजेसाठी गावाला जायचं होते. त्यांनी स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला, पण प्रत्यक्षात पैसे मिळालेच नाहीत.
नाशिकमध्ये अनेक बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यात बँकांना तीन चार दिवस सलग सुट्टी आहे. ग्रामीण भागातले नागरिक डिजिटल माध्यमातून पैसे काढण्यासाठी फारसे सरावलेले नसतात.
केवळ नाशिक मध्येच नाही तर राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे. एटीएम सेंटर्स आहेत पण पैसा नाही, अशी परिस्थिती आहे. सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात बँकांच्या एटीएम यंत्रणेलाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.