अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यटकप्रिय व्याघ्र प्रकल्प आहे. इथले पट्टेदार वाघ व्याघ्रप्रेमींसाठी निखळ आनंद देणारे मात्र या प्रकल्पातील गावांसाठी हा प्रकल्प जगण्यासाठी दुर्धर ठरलाय.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे देशभरातील व्याघ्रप्रेमीचं आवडीचं ठिकाण... असे असले तरी या प्रकल्पात असलेल्या गावांसाठी हा प्रकल्प संघर्षाचा ऐतिहासिक अध्याय आहे... या प्रकल्पात एकूण ६ गावं आहेत. यातील केवळ दीड गावं अन्यत्र पुनर्वसित झालीत. उरलेल्या गावांसाठी वनविभागाची पुनर्वसन योजना या ना त्या कारणानं रखडलीय...
यापैंकी एक मोठं गाव म्हणजे रानतळोधी... हे गाव पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरु आहे... वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेले आदिवासी ही जमीन सोडण्यासाठी तयार नाहीत. मात्र, वनविभाग ही योजना पुढे रेटत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गावात असलेल्या सार्वजनिक सुविधा बंद करण्यात आल्यात. गावाला जोडणारा कच्चा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे. वनविभाग या रस्त्याच्या दुरुस्तीची परवानगी टाळतंय.
सुमारे ५५० लोकवस्ती असलेल्या या गावात जाण्यासाठी ताडोबाच्या गाभा क्षेत्रातून जावे लागत असल्यानं वाघ-बिबटे आणि अन्य वन्यजीवांची मोठी भीती आहे. गावात आजारी पडलेल्या रुग्णाला उपचार पोहचविण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाहीत. दरवर्षी हाच प्रकार सुरु असल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आता श्रमदानाचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामस्थ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रोज श्रमदान करत आहेत. सुमारे ५० गावकरी वाघ-बिबटे आणि हिंस्त्र पशूंच्या भीतीदायक सान्निध्यात बस अथवा रुग्णवाहिका येण्यासाठी कार्यरत झाले आहेत. ग्रामस्थांचे हे प्रयत्न सुरु असताना वनविभाग अधिकारी मात्र मौन आहेत.
रोज सुमारे चार तास हे श्रमदान केले जातंय... थकलेले ग्रामस्थ आरामासाठी बसले तरी त्यांच्या आसपास एखाद्या बिबट्याची फेरी ठरलेली असते. मात्र, त्यांच्या व्यथेची कळ जाणून घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी मात्र चुकूनही येत नाहीत यासारखे दुर्दैव ते काय...