नितीन पाटणकर, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू होऊन आठ दिवस झालेत. मात्र, मृतांचे नातेवाईक अद्याप मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. शिवाय बिल्डरवरही कारवाई झालेली नाही. तरीही पोलीस म्हणतायत तपास सुरु आहे.
वर्षभरापूर्वी बालेवाडीत स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला होता. मृतांची संख्या मोठी असल्यानं, पोलिसांनी बिल्डरांवर गुन्हे दाखल केले खरे. मात्र, संबंधित बिल्डरांनी तब्ब्ल आठ महिन्यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन घेईपर्यंत पुणे पोलिसांना ते सापडलेच नाहीत. तोपर्यंत ते फरारच होते. अशी पुणे पोलिसांची कार्यक्षमता.
सिंहगड रस्त्यावरील दुर्घटनेबाबत पोलिसांनी एक पाऊल पुढं टाकलंय. पोलिसांनी बिल्डरवर गुन्हाच दाखल केलेला नाही. नाही म्हणायला पाटे डेव्हलपर्स असं मोघम नाव गुन्ह्यात टाकण्यात आलंय. त्यात जबाबदारी कोणाची हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. ती कधी करणार यावर पोलिसांचं उत्तर आहे तपास सुरु आहे.
पोलीस बिल्डरांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असताना, मृतांच्या नातेवाईकांना देखील अद्याप मदत मिळालेली नाही. पाटे बिल्डर्सच्या वतीनं त्यांना कुठलीच आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. मदतीसाठी कामगार विभागाकडे बोट दाखवण्यात येतंय. मृतांच्या नातेवाईकांना अद्याप मदतही करण्यात आली नसल्यानं नाराजी व्यक्त होतेय.
पोलीस आणि बिल्डरचं साटंलोटं असल्याचे आरोप होत असताना, बांधकाम व्यवसायिक या विषयावर बोलायला तयार नाहीत. पालिकेच्या बांधकाम विभागानेही बघ्याची भूमिका घेतलीय. कारवाई तर सोडाच माध्यमांना साधी प्रतिक्रिया द्यायला पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी तयार नाहीत.
अशा दुर्घटना झाल्या की मुकादम, सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई केली जाते. बडे मासे कारवाईच्या बाहेरच राहतात. त्यामुळं अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर बिल्डर आणि महापालिका अधिका-यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी होतेय.