राणेंच्या व्हायरल ऑडिओ क्लीपनंतर मराठा आंदोलकांची पोलिसांत धाव

'पुरावे असतील ते सादर करा... पुराव्यांशिवाय बोलू नका...'

Updated: Aug 4, 2018, 11:04 AM IST
राणेंच्या व्हायरल ऑडिओ क्लीपनंतर मराठा आंदोलकांची पोलिसांत धाव   title=

बीड : मराठा आंदोलनाच्या समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला... आणि त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली... या क्लिपनंतर एकच खळबळ उडालीय. नितेश राणेंच्या या दाव्यावर मराठा संघटनेनं आक्रमक भूमिका घेत ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याची मागणी केलीय. पुरावे असतील ते सादर करा... पुराव्यांशिवाय बोलू नका... असंही मराठा क्रांती ठोक मोर्चा अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. 

पोलिसांत तक्रार दाखल

यानंतर मराठा संघटनेचे नेत्यांची पोलिसांकडे धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. मराठा आंदोलन फोडण्याची सरकारची खेळी सुरू आहे... याआधीही सरकारनं आंदोलन स्थगित करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. आमची भूमिका आम्ही मांडलीय... त्यामुळे, पुराव्यांशिवाय नाहक बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. 

आंदोलकांचं स्पष्टीकरण 

गेल्या सतरा दिवसापासून आपण परळी येथे आंदोलन करीत आहोत. मात्र काही लोकांना या आंदोलनातून राजकीय स्वार्थ साधायचा आहे त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात आपण पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी दिलीय. 

आपल्याला कोणीही चर्चेला बोलावले नव्हते आणि आपणही जाणार नव्हतो... त्यामुळे मला काही मिळावे यासाठी हे सगळे सुरू असल्याचे आरोप करणे हास्यास्पद आहे, असंही पाटील यांनी म्हटलंय. 

राणेंची ऑडिओ क्लीप व्हायरल 

आबासाहेब पाटील यांच्यावर आरोप करणारी नितेश राणे यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणून बुजून टाळल्याचा आरोप केलाय. मराठा संघटनेच्या अशा आडमुठेपणामुळे आपली आणि नारायण राणेंची नाहक बदमानी झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला इतकंच नाही तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचाही गौप्यस्फोट या क्लिपमध्ये करण्यात आलाय. परळीहून काही जण महामंडळं आणि इतर मागण्या घेऊन आले होते पण आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल, असं नितेश राणेंनी या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटलंय. 

परंतु, ही ऑडिओ क्लीप कुणी व्हायरल केली मला माहीत नाही, असं नितेश राणेंचं म्हणणं आहे.