निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  

Updated: Jun 2, 2020, 02:22 PM IST
निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी title=
प्रतिकात्मक छाया

रायगड : निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता निसर्ग अलिबागला धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी निधी यांच्या माहितीनंतर अलिबाग येथे एनडीआरएची आणखी दोन पथके दाखल होणार आहेत. दरम्यान,  सध्या श्रीवर्धन आणि अलिबाग येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे.

अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली, उद्यापर्यंत या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर परवापर्यंत गंभीर स्वरुपाच्या चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता असून, हे वादळ येत्या ३ जूनला महाराष्ट्र आणि  गुजरातच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  

३ जूनला हे वादळ राज्यात हरिहरेश्वर जवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता हे वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी यांनी दिली. तसेच मुंबई,ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मीरा, भाईंदर, वसई आणि विरार परिसरालाही वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

यावेळी ताशी  १०५ ते ११०  किलोमीटरच्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून, मुंबई आणि परिसर  या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे, तसेच  या काळात  राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला  आहे. या वादळामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जाही केला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.