अकोला : अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याप्रकरणी नवी माहिती समोर येतेय.
अमित वाघ यांच्या दोन्ही मुलांनी जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शालेय वर्षासाठी शाळेत प्रवेशच घेतला नसल्याचं समोर आलंय. वाघ यांचा मोठा मुलगा स्पंदन प्रभात किड्स शाळेचा विद्यार्थी यावर्षी पहिलीत जाणार होता, तर धाकटा मुलगा शाश्वतही शाळेत जाणार होता. पण या दोघांसाठीही यावर्षी शाळेत प्रवेश घेतला नसल्याचं समोर आलंय.
अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि दोघंही मुलं बेपत्ता आहेत. सातारा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अमित वाघ यांचे संपूर्ण कुटुंबीय अशा प्रकारे अचानक बेपत्ता झाल्याने बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होतेय.
अमित वाघ हे अकोल्यातील खडकी येथील संतोष नगर भागात राहतात. ते सातारा येथे १३ जूनच्या पूर्वी सुट्यांमध्ये गेले होते. अमित वाघ यांची सातारा ही सासरवाडी असल्याची माहिती आहे.
१३ जूनच्या रात्रींपासून अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाले. त्यांचा सातारा पोलीस कसून शोध घेत आहेत. वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. तर काही बांधकामं पूर्णत्वास गेलेली आहेत.
ते अशा प्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.