New NCP President: राजीनाम्याच्या घोषणेनंतर शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निवृत्तीवर ठाम असल्यामुळे आता नव्या अध्यक्षाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल?, राष्ट्रवादीची धुरा कुणाच्या खांद्यावर असेल याचे आडाखे बांधले जातायेत. अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नावं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आली. मात्र या सर्व नावांमध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षा किंवा कार्यकारी अध्यक्षा होऊ शकतात. आता सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर का आहे? यावर मात्र अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दोन दशकांचा संसदीय राजकारणाचा अनुभव सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा 7 वेळा सन्मान करण्यात आलाय. तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संस्थापिका म्हणून संघटनात्मक कामाचा अनुभव देखील त्यांच्यासोबत आहे. सामंजस्याची आणि सर्वांना सोबत घेण्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी नेहमी घेतल्याचं दिसून येतं. उच्चशिक्षित आणि इंग्रजीवर प्रभुत्व असल्यानं राष्ट्रीय पातळीवर संवादाची हातोटी देखील त्यांच्याकडे आहे. पवारांची एकुलती एक कन्या असल्यामुळे त्या थेट वारसदार देखील आहेत.
एवढंच काय, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवारांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय. सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. इतकंच नाही तर राज्यातील राजकीय पक्षाची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होईल. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - Constitution of NCP : राष्ट्रवादीच्या घटनेत अध्यक्षाच्या निवडीबाबत काय तरतुदी?
दरम्यान, वस्ताद आपला एक डाव राखून ठेवतो, असं म्हणतात. धनंजय मुंडे यांच्यासह अण्णा बनसोडे, नितीन पवार, शेखर निकम. अनिल पाटील, धर्मरावबाब आत्राम, संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत माने, राजू नवघरे, दत्तामामा भरणे या नेत्यांनी अजित पवार यांना नेहमी पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता अजित पवार यांची भूमिका थेट असेल तर सुप्रिया सुळे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार, असं पक्कं मानलं जातंय.